राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडीत असलेल्या पाञ्चजन्यमधून अमेरिकेची दिग्गज ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये अॅमेझॉनचा उल्लेख 'ईस्ट इंडिया कंपनी 2.0' असा करण्यात आला आहे. यापूर्वीही पांचजन्यमधून इन्फोसिसवर निशाणा साधण्यात आला होता. तसंच इन्फोसिसच्या मआध्यमातून देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात काम करत नाही ना?, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती.
पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ३ऑक्टोबरला येणाऱ्या साप्ताहिकाचं मुखपृष्ठ ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीट केलेल्या मुखपृष्ठावर अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो छापण्यात आला असून त्याखाली #अॅमेझॉन इस्ट इंडिया कंपनी असा मथळा देण्यात आला आहे.
यासह त्यांनी एक कॅप्शनही लिहिलं आहे. "अॅमेझॉननं असं काय चुकीचं करतंय की त्यांना लाच देण्याची गरज भारतेय? का या महाकाय कंपनीला देशातील उद्योग, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृतीसाठी लोकं धोका मानतात?," असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.
लाच दिल्याचा आरोपयापूर्वी काँग्रेसने थेट आरोप केला की, ८,५४६ कोटी रुपये ॲमेझॉनने लाच म्हणून दिली. पक्षाचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारला विचारलं होतं की, ॲमेझॉनच्या ६ कंपन्यांनी मिळून जे ८,५४६ कोटी रूपये दिले त्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत? हा पैसा काढून कोणाला आणि कोणत्या प्रकारे दिला गेला? सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर सुपारी घेतल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, यानंतर एका अहवालानुसार ॲमेझॉनने आपल्या काही प्रतिनिधींविरुद्ध भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपाखाली तपास सुरू केला आहे. या संदर्भात ॲमेझॉनने वरिष्ठ कॉर्पोरेट वकिलांना रजेवर पाठवले आहे. कंपनीत भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही आणि यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असे ॲमेझॉनने एक निवेदन प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.