कोलकाता: कोळसा घोटाळाप्रकरणी सीएम ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावरुन ममता यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या कुटुंबीयांना नोटीस मिळाल्यास आम्ही कायदेशीर लढाई लढू, असे त्या म्हणाल्या. भाजपवर टीका करताना ममता बॅनर्जींनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केला.
ममता म्हणाल्या, 'भाजप म्हणते कोळसा घोटाळ्याचा माल कालीघाटात जातो. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, मग हा पैसा मां कालीकडे जात आहे का? केंद्र ना आम्हाला मदत करत आहे, ना जीएसटी भरपाई देत आहे. या संदर्भात पंतप्रधानांना भेटल्यावर लोक म्हणतात की मी सेटिंगसाठी गेले होते. पण, मी भाजपसारखी नाही, मी सेटिंग करत नाही.'
RSS वर काय म्हणाल्या ममता..?ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'आरएसएस वाईट नाही. भाजपच्या विचारांशी सहमत नसलेलेही अनेक लोक आरएसएसमध्ये आहेत. अनेक संघ कार्यकर्त्यांना भाजप आवडत नाही आणि ते लवकरच बाहेर येतील.' पोलीस दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत होत्या. याचा राजकीय अर्थ काय ?ममता बॅनर्जी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहेत. अलीकडच्या काळात अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे पक्षाला फटका बसला आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जींना डॅमेज कंट्रोल करण्याची मोठी गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड खेळले होते, आता ममता पुन्हा एकदा हिंदू कार्ड खेळण्याच्या तयारीत आहेत. हिंदू व्होट बँकेच्या बाबतीत भाजपची खरी ताकद आरएसएसकडे आहे, हे ममतांना माहीत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही लोकही भाजपच्या विरोधात गेले तर त्यांच्यासाठी ते मोठे आव्हान ठरू शकते.