गुवाहाटी : नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) भारतातील कोणत्याही नागरिकाच्याविरोधात बनवण्यात आलेला नाही. देशातील मुस्लिमांचे सीएएमुळे काहीही नुकसान होणार नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.देशाच्या फाळणीनंतर एक आश्वासन दिले गेले होते की, आम्ही आपल्या देशातील अल्पसंख्यकांची काळजी घेऊ. आम्ही आजपर्यंत त्याचे पालन करीत आहोत. पाकिस्तानने तसे केलेले नाही, असे भागवत म्हणाले.
सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमाला काहीही अडचण होणार नाही. सीएए आणि एनआरसीचे हिंदू-मुस्लिम विभाजनाशी काहीही देणे-घेणे नाही. राजकीय लाभासाठी त्याला सांप्रदायिक रंग दिला गेला, असे मोहन भागवत म्हणाले.
जगाने शिकवू नये
मोहन भागवत म्हणाले की, आम्हाला जगाकडून धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही शिकण्याची गरज नाही. ते आमच्या परंपरांत, आमच्या रक्तात आहे. आमच्या देशाने त्यांना लागू केले व त्यांना जिवंत ठेवले.