'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 06:48 PM2024-12-01T18:48:51+5:302024-12-01T18:51:11+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

RSS Mohan Bhagwat Statement opposition raised questions on Mohan Bhagwat's statement | '3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

'3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

RSS Mohan Bhagwat Statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीचा दर (प्रजनन दर) घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जातो, तेव्हा तो समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. अशा कितीतरी भाषा आणि समाज नष्ट झाला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने 3 मुलांना जन्म दिला पाहिजे.' दरम्यान, भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत.

सपा प्रवक्त्याची टीका
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चंद म्हणाले की, 'मोहन भागवतांची वक्तव्ये भाजपला अस्वस्थ करणारी असतात. गेल्या वेळीही मोहन भागवत म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीत मंदिर शोधणे बंद करावे. मंदिर-मशिदीचे राजकारण करणाऱ्यांकडे तेव्हा उत्तर नव्हते. आता मोहन भागवत देशाच्या लोकसंख्येवर बोलत आहेत. आताही भाजपकडे उत्तर नाही. सपाची विचारधारा आरएसएसशी जुळणारी नाही, पण त्यांनी काही बरोबर म्हटले असेल, तर त्याला बरोबर म्हणणे चुकीचे नाही.'

काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न 
काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहन भागवत यांना सवाल करत ते म्हणाले, 'जे आधी आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांना योग्य भाव नाही अन् मोहन भागवत जास्त मुले जन्माला घालण्याची वक्तव्ये करत आहेत. देशात बेरोजगारी आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत. चीनची लोकसंख्या कमी असताना आज तो महासत्ता बनला आहे. मोहन भागवत यांना चीनकडून शिकता येत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या बाबतीत देश शक्तिशाली बनवायचा आहे.' 

ओवेसींची टीका
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'मोहन भागवत म्हणतात की, लोकसंख्या वाढली पाहिजे, पण मुलांना काही फायदा मिळेल, याची खात्री ते करतील का? गरीब कुटुंबांना दरमहा 1500 रुपये देणार का? भागवतांनी आपल्या समाजातील उदाहरणे आधी दाखवावीत.'

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
विज्ञान मानते की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली गेला तर तो समाज आपोआपच संपुष्टात येतो. या कारणामुळे अनेक भाषा आणि समाज संपुष्टात आले. भारताचे लोकसंख्या धोरण सन 2000 च्या सुमारास ठरविण्यात आले होते, ज्यामध्ये देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1 असावा असे स्पष्ट करण्यात आले होते. मानवी जन्मदर 1 वर ठेवता येत नाही, त्यामुळे किमान 2 किंवा 3 मुले जन्माला आली पाहिजेत. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.


 

Web Title: RSS Mohan Bhagwat Statement opposition raised questions on Mohan Bhagwat's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.