ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 1 - सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढण्याच्या निर्णयाविरुद्ध संघाच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. राजीनामा देऊन सर्वजण भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यात झोकून देणार आहेत. प्रांताच्या अधिका-यांना जाब विचारून त्यांच्या समक्ष हा निर्णय जाहीर करण्यात आला. वेलिंगकर यांना संघचालक पदावरून हटवण्याचा आदेश भाषा सुरक्षा मंचचे काम करण्याच्या कारणावरून आणि मंचच्या राजकीय पर्यायाच्या निर्णयावरून निघाला असेल तर आम्हीही त्याच कारणावरून राजीनामा देतो, असे सांगून तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी आणि विभाग कार्यकारिणीर्पयतच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्यात आला. - प्रांत अधिका-यांना रोखून धरलेवेलिंगकर यांना संघचालक पदावरून काढण्याचा आदेश रद्द करून त्यांची पुन्हा नियुक्ती करा, असा आग्रह धरून गोव्यातील 527 प्रमुख संघ कार्यकर्त्यांनी प्रांत अधिका-यांना सभागृहात रोखून धरले. फेरनियुक्तीचा आदेश दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. प्रांत कार्यकारिणीच्या अधिका-यांवर प्रश्नांची सरबत्ती करून कारवाईचे स्पष्टीकरण मागितले. त्यांच्याकडे स्पष्टीकरण नसल्यामुळे वेलिंगकर यांची त्वरित फेर नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करून सर्व कार्यकर्त्यांनी या अधिका:यांना सभागृहात रोखून धरले होते. त्यामुळे प्रांताचे 5 अधिकारी या सभागृहात अडकून होते. त्यात सुनील सप्रे, दादा गोखले आणि सुमंत आमशेकर यांचा समावेश होता. संध्याकाळी 6.30 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री पावणोअकरा वाजताही चालूच होती. कार्यकर्ते सभागृहातून बाहेर जायला तयार नाहीत आणि प्रांताच्या पदाधिका-यांना सोडायलाही तयार नाहीत, अशी स्थिती होती. या बैठकीस वेलिंगकर, रत्नाकर लेले व इतर ज्येष्ठ संघ नेते उपस्थित होते.
गोव्यात आरएसएस पदाधिकारी राजीनामे देणार
By admin | Published: September 01, 2016 12:03 AM