नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल दिलेल्या निर्णयामुळे दलित संघटना नाराज आहेत. या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी भारत बंदची हाकदेखील दिली होती. या पार्श्वभूमीवर दलितांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आरएसएसने आपल्या संबंधित संघटनांना १४ एप्रिलला आंबेडकरांची जयंती साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे १४ एप्रिलला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल दिलेल्या निर्णयाचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकार दलितविरोधी असल्याचा आरोप आणि प्रचार विरोधकांकडून सुरु झाला आहे. त्यामुळेच २ एप्रिलला दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. यानंतर आरक्षण कायम ठेवले जाईल, अशी भूमिका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मांडली होती. दलित आणि आदिवासी यांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे अधिक मजबूत करु, असेही त्यांनी म्हटले होते. अॅट्रॉसिटीच्या मुद्यावर भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जात असताना आता संघ आणि संघाशी संबंधित संघटना भाजपच्या मदतीला धावून आल्या आहेत. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी बाईक रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. 'समाज जातीच्या आधारे विभाजित होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. काहीजण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरोधात आमचा संघर्ष सुरु आहे,' असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी म्हटले.
दलितांच्या नाराजीचा धसका; संघाशी संबंधित संघटना आंबेडकर जयंती साजरी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 9:30 AM