काँग्रेस नेते राहुल गांधी आज केंद्रशासित प्रदेश लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. आज आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीसोबतच राहुल गांधी लडाखमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांशी संवादही साधणार आहेत. राहुल गांधी लडाखमधील LAC चा दौरा करणार आहेत. लडाखमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "प्रत्येक संस्थेत आरएसएस आपले लोक ठेवत आहे."
राहुल गांधी यांनी "आरएसएसचे लोक सर्व काही चालवत आहेत. तुम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की ते त्यांची मंत्रालये चालवत नाहीत, तर त्यांचे ओएसडी आरएसएसने नियुक्त केले आहेत. तेच सर्व काही करत आहे. त्यांनी अशीच परिस्थिती निर्माण केली आहे. प्रत्येक संस्थेत ते सर्व काही चालवत आहेत" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी हे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लेह येथील पँगोंग तलावावर त्यांना आदरांजली वाहणार आहेत. 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. काँग्रेस हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील फुटीरतावादाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राहुल गांधी म्हणाले की, काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. तुम्ही भारतात गेलात, लोकांमध्ये जा, तुम्हाला दिसेल की लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "भारतातील लोक विविधतेला खोलवर समजून घेतात, जी आपल्या देशाची ताकद आहे. लोकांमध्ये जाऊन खूप काही शिकायला मिळाले. आम्ही वेगवेगळ्या राज्यात गेलो. हजारो लोकांशी बोललो. देशातील प्रमुख प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण यावर फारसे बोलले जात नाही. एकतर द्वेषाची चर्चा आहे किंवा ऐश्वर्या राय, शाहरुख खानची चर्चा आहे. देशाच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा होत नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.