नवी दिल्ली - सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भागवत यांच्या वक्तव्यावरून लोकसंख्या नियंत्रण हा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असल्याचं दिसून येतं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोहन भागवत यांनी असं म्हटलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबादमध्ये मोहन भागवत यांनी बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असं म्हटलं आहे. तसेच 'लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल. सध्या देशातील वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. लोकसंख्या नियंत्रणात येईल' असं भागवत यांनी चर्चेदरम्यान म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे. जबरदस्तीने नसबंदी करणार का? असं सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्याचे आरोप केले जातात. सोशल मीडीयावर सध्या मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होऊ लागली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सअॅपवर फिरवण्यात येत आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे.
हा खोटा प्रचार केला जात असून भागवत यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप संघाकडून केला जात आहे. तसेच सरसंघचालक मोहन यांच्या नावाने चुकीची माहिती सोशल मीडियात व्हायरल केली जात असून ती टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका
‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली
मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद
जनतेला भवितव्याचा अधिकार; पाकव्याप्त काश्मिरात सार्वमत घेण्यास इम्रान खान तयार पण...