- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : विशिष्ट धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपने नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई केली असली तरी संघ परिवारात मात्र नाराजीचे वातावरण आहे. राम मंदिर आंदोलनात आघाडीवर असलेल्या विश्व हिंदू परिषदही नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरुद्ध सत्ताधारी भाजपने केलेल्या कारवाईने अत्यंत नाराज आहे.
या दोन प्रवक्त्यांना ‘फ्रिंज एलिमेंट’ म्हटल्याने भाजप कार्यकर्ते आणि संघ परिवारातील अन्य संघटना नाराज आहेत. वाद उफाळल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ‘फ्रिंज एलिमेंट’ हा शब्द नाही; परंतु, कतार आणि कुवेत येथील भारतीय दूतावासांनी गेल्या रविवारी जारी केलेल्या निवेदनात हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दूतावासाच्या निवेदनाबाबत कानावर हात ठेवले असून नवी दिल्लीत जारी केलेले निवेदनच अधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘फ्रिंज एलिमेंट’ या शब्दाचा वापर केल्याने संघ परिवार नाराज होणे साहजिक आहे. गेल्या रविवारपासून सोशल मीडिया पोस्टस् आणि व्हॉटस्ॲप संभाषणातही या शब्दावरुन आणि दोन प्रवक्त्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कठोर कारवाईवरून संताप व्यक्त होत आहे.