कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी गुरुवारी सांगितलं की, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कुठलीही संघटना कर्नाटकमध्ये अशांतता परवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना हे विधान केलं आहे.
राज्यामध्ये पीएफआय आणि बजरंग दलावर बंदी घालण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत विचारलं असता प्रियांक खर्गे यांनी सांगितले की, कुठलीही संघटना कर्नाटकात अशांततेची बिजे पेरत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही त्यांचा घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतीने सामना करून. मग बजरंग दल असो, पीएफआय असो किंवा अन्य कुठली संघटना असो. जर या संघटना कर्नाटकमधील कायदा आणि व्यवस्थेसाठी धोकादायक बनत असतील तर आम्ही त्यांच्यावर निर्बंध लादण्यास मागेपुढे पाहणार नाही.
यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेसने जाहीरनाम्यामधून बजरंग दलावर निर्बंध घालण्याचं आश्वासन दिलं होतं. आ आश्वासनामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच संघ आणि भाजपाने त्यावर टीका केली होती. मात्र हा मुद्दा काँग्रेससाठी निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरला होता.