Rahul Gandhi Latest News: इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून झालेल्या चुकांवर आणि उणिवांवर बोट ठेवले. काँग्रेसच्या धोरणात चूक झाल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेत आला. जर पुन्हा मूळ जनाधार काँग्रेससोबत आला तर भाजप आणि आरएसएसला जावं लागेल आणि असे लवकरच होईल, असे भाष्य विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३० जानेवारी रोजी दलित इन्फ्लुअन्सरच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दलित, अल्पसंख्याक आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहांच्या विकासाबद्दल भाष्य केले. या समुदायांना केवळ राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याने समस्या संपणार नाहीत, तर जोपर्यंत त्यांना संस्था आणि संपत्तीमध्ये भागीदारी मिळत नाही, समस्या संपणार नाहीत, असे ते म्हणाले.
काही चुका झाल्या, काँग्रेसला स्वीकाराव्या लागतील -राहुल गांधी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचे स्मरण करत राहुल गांधी म्हणाले, तेव्हा काँग्रेसला दलित, अल्पसंख्याक आणि भटक्या विमुक्तांचा पूर्ण पाठिंबा होता. पण, १९९० च्या दशकात काही चुका, उणीवा राहिल्या आणि हे सत्य पक्षापासून लपलेले नाही.
"मागील १०-१५ वर्षात काँग्रेस पक्षाने ते केले नाही, जे त्याने करायला पाहिजे होते (दलित, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्तांसाठी). जर मी असे बोललो नाही, तर मग माझं बोलणं खोटं असेल. जर काँग्रेसने दलित, भटक्या विमुक्तांना साथ दिली असती, त्यांचा विश्वास टिकवून ठेवला असता, तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती", असे राहुल गांधी म्हणाले.
"इंदिरा गांधी यांच्या काळात दलित, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्तांचा काँग्रेसवर पूर्ण विश्वास होता. पण, १९९० नंतर त्यात उणीवा निर्माण झाल्या. हे सत्य काँग्रेसला स्वीकारावंच लागेल", असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
"...तर भाजप आणि आरएसएस सत्तेतून पायउतार होईल"
याच कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ज्या दिवशी आपली एकजूट होईल, ते (भाजप-आरएसएस) सत्ता सोडून जातील. ज्यादिवशी काँग्रेसचा मूळ जनाधार एकत्र येईल, त्या दिवशी भाजप-आरएसएस पळून जाईल. आपल्याला आपल्या एकजुटीवर काम करावं लागेल. आपल्याला दलित, अति मागास, अल्पसंख्याकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल आणि त्यांना पुढे घेऊन जावे लागेल. असे करण्यासाठी काही वर्षे लागतील", असे राहुल गांधी म्हणाले.
"तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बघत असाल. भाजप काँग्रेसला काहीही करू शकत नाही. ते देश चालवू शकत नाही. ते धोकेबाज आहेत", अशी टीका राहुल गांधींनी भाजपवर केली.
"जोपर्यंत दलित, मागास, भटक्या विमुक्तांना सत्तेत त्यांचा हिस्सा मिळत नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. शिक्षण व्यवस्थेत त्यांना भागीदारी मिळाली, पण नियंत्रण मिळालं नाही. सध्या शून्य आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली.