लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली / गांधीनगर : चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले. मांडविया यांनी सांगितले की, या देशातून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोना संसर्गाचे लक्षण दिसून आल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल.
चीन, जपान, सिंगापूर आणि थायलंडच्या प्रवाशांवर एअर सुविधा पोर्टलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आपला आरटी-पीसीआर रिपोर्ट अगोदरच अपलोड करावा लागेल. भारतात आल्यानंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंगही केली जाईल. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, लाइफ सपोर्ट उपकरणे तयार ठेवा, असे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.
७५ टक्के लाेकांनी घेतला नाही बूस्टर डाेस
देशातील ७५ टक्के लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस घेतलेला नाही. काेणत्याही राज्यात बूस्टर डाेसचे प्रमाण ५० टक्क्यांच्यावर गेलेले नाही. मात्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे.
सध्या लॉकडाऊनची गरज नाही
भारताला सध्याच्या कोविड परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्याची किंवा लॉकडाऊन लादण्याची आवश्यकता नाही. देशात व्यापक लसीकरण झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ फार कमी रुग्णांवर येईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सर्वत्र सतर्कता
- हैदराबाद विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅंडम चाचणी. - कटरा येथे माता वैष्णाे देवी मंदिरात भाविकांना विना मास्क प्रवेश मिळणार नाही.- लष्करानेही जवानांना काेविड प्राेटाेकाॅलचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या.- २७ डिसेंबरला रुग्णालयातील आराेग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी माॅक ड्रिल हाेणार.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"