नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायद्यात (आरटीआय) दुरुस्त्या करून मोदी सरकारने माहिती आयुक्तांचे अधिकार सौम्य केल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी करून या ऐतिहासिक कायद्याचे सामर्थ्य कमी करण्यासाठीचा हा शेवटचा हल्ला आहे, असे म्हटले. सरकारने ज्या दुरुस्त्या केल्या त्यामुळे कोणताही माहिती आयुक्त स्वत:च्या कामकाजातील हस्तक्षेप रोखू शकणार नाही आणि मोदी सरकारच्या इशाऱ्यांवर त्याला काम करावे लागेल, असे गांधी यांनी निवेदनात म्हटले.
देशभर माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार उघड केला आहे, सरकारी धोरणांची परिणामकारकता तपासली आहे, तसेच नोटाबंदी आणि निवडणुकांच्या प्रक्रियांमधील दोष उघड करण्यास तो वापरला आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
विरोध करतच राहूसंसदेत आम्ही त्या दुरुस्त्यांना विरोध केला होता आणि पुढेही त्यांना विरोध करीत राहू. आमच्या लोकशाही संस्थेच्या या तुकड्या तुकड्यांनी होत असलेल्या हानीचा आम्ही निषेध करतो व देशाचे नुकसान करणाºया मोदी सरकारच्या या स्वार्थी कृत्याविरोधात लढतच राहू, असे सोनिया गांधी म्हणाल्या.