मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात कुस्तीपटू गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका करणारी काश्मीरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. झायरा वसीमनं आपल्या इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली आहे. झायरा काल नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइनन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशानं असभ्य वर्तन केलं.
विमानात आपल्या जागेवर झायरा झोपलेली असताना अगदी तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या एक पुरुष प्रवासी तीच्या सीटवर मानेजवळ आपला पाय टाकून झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली होती. हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. तीच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही, असा आरोपही तीने केला आहे. या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्नही तीने केला. मात्र, विमानातील अंधूक प्रकाशामुळे तीला ते शक्य झाले नाही.
मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले. संबंधित प्रवाशावर आता कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईत पोहचल्यावरनंतर लाईव्ह व्हिडिओ - झायरानं मुंबईमध्ये पोहचल्यानंतर आपल्या इनस्टाग्रामद्वारे लाईव्ह येतं आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ती स्वताचे आश्रू रोखू शकली नाही. स्वतसोबत झालेल्या असभ्य वर्तनाबाबत माहिती देताना तिला रडू कोसळलं. यावेळी ती म्हणाली की विमानात येवढे सर्वजण असताना एकजणही माझ्या मदतीला आलं नाही.
या प्रकरणाची आम्ही संपूर्ण चौकशी सुरु - विस्तारा एअरलाइनन्सव्हिडीओ प्रसारीत झाल्यानंतर विस्ताराला जाग आली असून आम्ही झायराच्या पाठीशी आहोत असे त्यांनी म्हटले आहे. झायरासोबत आमच्या दुसऱ्या एका ग्राहकाने असभ्य वर्तन केल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. या प्रकरणाची आम्ही संपूर्ण चौकशी करीत आहोत. कुठल्याही परिस्थितीत आम्ही झायराच्या बाजूने आहोत. प्रवाशांची अशी वागणूक आम्ही खपवून घेणार नाही, असे विस्ताराच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
झायरा वसीमसोबत झालेला प्रकार लाजिरवाणा - विजया रहाटकर
अभिनेत्री झायरा वसीमसोबत विमानात झालेला छेडछाडीचा प्रकार लाजिरवाणा आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, DGCA ने याबाबत चौकशी करावी यासाठी राज्य महिला आयोग योग्य ती पावले उचलेल. याप्रकरणावर बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या की, मुंबई पोलिसांनी यात तातडीने लक्ष घालावे असे निर्देश देण्यात आले आहेत. एअर लाईन्सने याबाबत काय कारवाई केली याची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे केबिन क्रुने झायराला सहकार्य केले नाही याबाबत ही चौकशी व्हावी. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सहप्रवाशांनी मदत न करणे हे खेदजनक आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग झायरा सोबत आहे.