ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. ४ - भारतीय सेवेत असणा-या अधिका-यांना आणि जवानांना सोशल नेटवर्किंगचा वापर करताना काय करावे आणि काय करु नये असा नियम काढण्यात आला आहे. यामध्ये जवांनानी फेसबुकसह इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइट्सवर पॉर्न पाहू नये. तसेच, ओळख नसलेल्या कोणत्याही व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये. अशा प्रकारचे काय करावे आणि काय करु नये असे दहा वेगवेगळे नियम तयार करण्यात आले आहेत.
भठिंडा येथून गेल्या २८ तारखेला हवाई दलाच्या जवान रणजित के के याला फेसबुकच्या माध्यमातून हवाई दलाच्या तळांची संवेदनशील माहिती एका सुंदर महिलेला पाठविली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. रणजितने फोटो पाठविलेली महिला ही यूकेतील पत्रकार असल्याचे वाटले होते, मात्र ती एका गुप्तहेर संघटनेशी निगडीत असल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर लष्कराने अशी नियमावली तयार केल्याचे समजते.
ही नियमावली पुढीलप्रमाणे -
1. सोशल मिडियावर अश्लील संकेतस्थळे, छायाचित्रे पाहु नये
2. सोशल मिडियावर लष्कराच्या गणवेशामधील छायाचित्रे प्रसिद्ध करु नये
3. बक्षिसाची लालुच दाखविणाऱ्या जाहिरातींच्या संकेतस्थळांस भेट देऊ नये
4. लष्करामधील हुद्दा, विभाग वा सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणाची माहिती उघड करु नये
5. अज्ञातांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्स स्वीकारु नये
6.लष्करामधील औपचारिक ओळख जाहीर करु नये
7. संगणक वा लॅपटॉपवर लष्कराशी संबंधित कोणतीही माहिती साठवून ठेवू नये
8. लष्करामधील जवानांच्या आप्तस्वकीयांनी त्यांच्यासंदर्भातील माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध करु नये
9. शस्त्रासहित छायाचित्र प्रसिद्ध करु नये
10. लष्कराशी संबंधित कोणतेही छायाचित्र प्रसिद्ध करु नये