नवी दिल्ली : विमानांमध्ये बॉम्ब पेरून ठेवल्याची धमकी देणारे चार निनावी फोन कॉल्स दिल्ली आणि बेंगळुरु विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्याने बुधवारी प्रचंड खळबळ उडाली. बॉम्बच्या या फोनमुळे दोन आंतरराष्ट्रीय आणि एका देशांतर्गत विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. गेल्या पाच दिवसांत घडलेल्या अशा प्रकारच्या दुसऱ्या घटनेमुळे विमान प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या विमानांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच थांबविण्यात आले तर बेंगळुरु विमानतळावर एअर आशियाच्या एका विमानाचे उड्डाण याच कारणावरून थांबविण्यात आले. नवी दिल्लीहून काठमांडूला जाणाऱ्या दोन विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे फोन कॉल आल्यानंतर या दोन्ही विमानांचे उड्डाण लगेच थांबविण्यात आले. उड्डाण थांबविण्यात आलेले एक विमान एअर इंडियाचे तर दुसरे जेट एअरवेजचे आहे.एअर इंडियाच्या एआय-२१५ आणि जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू २६० या विमानांचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विमानांमध्ये बॉम्ब पेरून ठेवलेले असल्याचा निनावी फोन विमानतळावरील जेट एअरवेज सुरक्षा कार्यालयाला मिळाला. एअर इंडियाचे विमान दुपारी १.१५ वाजता आणि जेट एअरवेजचे विमान दुपारी १.३० वाजता काठमांडूला उड्डाण करणार होते. फोन आल्यानंतर या दोन्ही विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले. काठमांडूला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन कॉल मिळण्याची पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता आणि त्यानंतर विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले होते. परंतु नंतर ती अफवा असल्याचे लक्षात आले.- बुधवारी असाच फोन आल्यानंतर या दोन्ही विमानांमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले आणि विमानाने निर्जन स्थळी नेऊन बॉम्बचा कसून शोध घेण्यात आला. परंतु बॉम्ब आढळला नाही आणि ही एक अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. विमानात बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोन्ही विमानांनी सायंकाळी ७.५० वाजता काठमांडूकडे उड्डाण केले.बॉम्ब असल्याचा फोन आल्याने बेंगळुरुहून पणजीला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले.
बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने विमाने खोळंबली
By admin | Published: January 28, 2016 1:13 AM