लखनौ - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्कात मोठी कपात केली. त्यामुळे, दशभरात पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी कमी झाले आहे. मात्र, त्यानंतर अनेक ठिकाणी इंधनाची कमतरता जाणवली. विशेष म्हणजे पेट्रोल पंप चालक-मालक संघटनांनी एकदिवसीय बंद पुकारात आंदोलनही केले होते. पण, अद्यापही पेट्रोल-डिझलेची कमतरता काही ठिकाणी जाणवत आहेत. त्यातूनच इंधनाचे दर पुन्हा वाढणार असल्याच्या अफवाही पसरत आहेत. उत्तर प्रदेशच्या हरदोई येथे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून आली.
हरदोई येथील पेट्रोल पंपावर निम्म्या रात्रीच वाहनधारकांनी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याची अफवा पसरल्याने या वाहनचालकांनी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. त्यातच, अनेक पंपांवरील इंधन साठा संपुष्टात आला होता. पेट्रोल न मिळाल्याने अनेक वाहनचालकांना संकटाचा सामना करावा लागला. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय पांडे म्हणाले की, आज सायंकाळपर्यंत सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल.
सोमवारी डेहरादून येथेही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. तेथेही पेट्रोल संपल्याची अफवा पसरताच पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा पसरल्याचे समजते. दरम्यान, पेट्रोलच्या किंमती वाढणार असल्याच्या अफवा पसरत असताना रिलायन्सने पेट्रोलच्या दरात 5 रुपयांची वाढ केली आहे. मात्र, पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली होती. उशिरापर्यंत ते पेट्रोलची वाट पाहत होते.