ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 7- प्लॅस्टिकचे तांदूळ काही किराणा मालाच्या दुकानात विकायला आल्याची अफवा मंगळवारी तेलंगणा आणि आंध्रप्रदेश भागात पसरली होती. हैदराबादच्या सरूरनगरमधील एका बिर्याणी पॉईंटवर प्लॅस्टिकच्या तांदळापासून तयार केलेली बिर्याणी विकण्यात आली होती. त्याचवेळी मीरपेत भागातही तसाच प्रकार घडला होता. तेथील किराणा मालाच्या दुकानातून तांदूळ खरेदी करताना एका व्यक्तीला प्लॅस्टिकचा तांदूळ देण्यात आला. या दोन घटनांनंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ विकला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने मीरपेतमधील दुकानावर छापे टाकून तेथील तांदळाचे काही नमुने जप्त केले आहेत. या नमुन्यांची सध्या तपासणी होते आहे. दरम्यान, प्लॅस्टिकचा तांदूळ आंध्रप्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याती अफवा सोशल मीडियावर पसरली आहे.
"नंदनवनम कॉलनीत राहणाऱ्या अशोक नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली होती, गेल्या काही दिवसापासून त्यांच्या घरातील व्यक्तींकडून पोट दुखणं, हात-पाय दुखणं यासारख्या तब्येतीच्या तक्रारी येत आहेत.सोमवारी रात्री अशोक कामावरून परत आल्यावर त्यांच्या पत्तीने त्यांना जेवायला भात दिला. तो भात खाण्याच्या योग्यतेचा नव्हता, अशी माहिती मीरपेत पोलिसांनी दिली आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या तांदळासंबंधीत पोस्ट व्हायरल केले जात आहेत. ज्यामुळे मंगळवारी आंध्र प्रदेशातील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. दुकानातून जमा केलेले तांदळाचे नमुने सध्या तपासले जात आहेत. अहवाल अजून येणं बाकी असल्याने अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती दिली जात नाही आहे. विशेष म्हणजे वजन आणि उपाय विभागाकडून तांदूळ मिसळण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी पथक तयार करण्याची योजना आखली जाते आहे.
फेक किंवा प्लॅस्टिकचा तांदूळ बाजारात विकला जात असल्याची माहिती आम्हाला सोशल मीडियावरून समजली पण या संबंधी वरिष्ठांकडून कुठल्याही सूचना आल्या नाहीत. तरिही चार अन्न निरिक्षकांना विशाखापट्टणममधील मुख्य तांदूळ व्यापाऱ्यांकडे पाठवत असल्याची माहिती वजन आणि उपाय विभागाचे सहाय्यक अन्न नियंत्रक श्रीनिवास राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.