उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी नेपाळमधील एका घटनेचा व्हिडीओ महाकुंभमेळ्यातील घटना म्हणून सोशल मीडियावर शेअर केल्याचा आररोप आहे. आता महाकुंभमधील कायदा आणि सुव्यवस्था पाहत असलेल्या पोलिसांना अशा प्रकारे दिशाभूल करणारे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या स्नान पर्वादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर भ्रामक पोस्ट शेअर करणाऱ्या आठ जणांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या लोकांनी नेपाळमधील व्हिडीओ प्रयागराजमधील असल्याचे भासवून शेअर केल्याचा आरोप आहे. महाकुंभ २०२५ प्रयागराज म्हणजे मृत्यूचा महाकुंभ, अशी अफवा पसरवली जात होती. तसेच या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला. नातेवाईक शवविच्छेदन गृहामधून खांद्यावरून मृतदेह नेत आहेत. किमान रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मृतदेह नेण्याची व्यवस्था व्हायला हवी होती, असेही या पोस्टमध्ये म्हटले होते.
मात्र या व्हिडीओची सत्यता पडताळली असता तो नेपाळमधला असल्याचे दिसून आले. तसेच कुंभमेळा पोलिसांकडून हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, नेपाळमधील घटनेशी संबंधित व्हिडीओ प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील असल्याची अफवा पसरवणाऱ्याविरोधात कुंभमेळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.