कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. येथील मिदनापूरमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
पश्चिम बंगालमध्ये सिंडिकेटच्या मर्जीशिवाय कोणतेही काम करणे कठीण झाले आहे. साधी पूजा करायची असेल तरी सुद्धा अवघड झाले आहे. बळजबरीने वसूल करण्यासाठी सिंडिकेट आहे. शेतक-यांना मिळणारा नफा काढून घेण्यासाठी सिंडिकेट आहे. तसेच, सिंडिकेट आपल्या विरोधकांची हत्या करणा-यासाठी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, बंगालमध्ये राजकीय आणि आर्थिक रॅकेटला पश्चिम बंगालमध्ये सिंडिकेट म्हटले जाते.
याचबरोबर, राज्यातल्या शेतकऱ्यांचेही हाल सुरु आहेत. गरिबांचा विकास करण्यासाठी मुख्यंत्री ममता बॅनर्जींनी कोणतीही पावले उचलली नाहीत. तरूणांना राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. माँ-माटी-मानुष या घोषणेमागचा खरा चेहेरा आता समोर आला आहे, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान मंडप कोसळला. या मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. सभा आटोपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.