मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला रविवारपासून जोरदार सुरुवात होत असून, पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भात मतदान होणार असल्याने तेथील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १ व ३ एप्रिल रोजी, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ५ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग भरणार आहे. मोदी यांची पहिली सभा १ एप्रिलला वर्धा येथे तर दुसरी सभा ३ एप्रिल रोजी गोंदिया येथे होईल.
पहिल्या टप्प्यात विदर्भातच मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने तिथे रिंगणातलि उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. देवदेवतांचे दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. तेथील उमेदवारांना प्रचारासाठी एकच आठवडा असल्याने ते तणावाखाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार असून, तेथील उमेदवारही आता नक्की झाले आहेत. दरम्यानच्या काळात रावेरमधून काँग्रेसने डॉ. उल्हास पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देताना काँग्रेसने दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनाही त्या संघटनेत पाठवले आहे. सांगलीतून तेच निवडणूक लढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीत राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष व जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे मैदानात उतरणार आहेत.संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांची त्या पक्षातर्फे पुण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. पालघरमधून काँग्रेसप्रणित बहुजन विकास आघाडीने तर ईशान्य मुंबईतून भाजपने आपला उमेदवार अद्याप ठरविलेला नाही. ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळता कामा नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे.औरंगाबादमध्ये शनिवारी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे विलास औताडे व अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी अर्ज भरले. शिवसेना व आमदारकी सोडलेले हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. साताऱ्यातून शिवसेनेतर्फे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी अर्ज भरला, तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून शिवसेनेचे विनायक राऊ त व राष्ट्रवादीचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांनीही आज अर्ज सादर केले. नाशिकमध्ये हरिश्चंद्र चव्हाण व माणिकराव कोकाटे यांनी बंडाचे निशाण अद्याप मागेघेतले नसल्याने भाजप नेते त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन्यत्र काँग्रेससोबत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोलापुरात मात्र प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माकपचे तेथील माजी आ. नरसय्या आडम यांचे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी पटत नसल्याने त्यांनीच अॅड. आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.देशमुखांविरुद्ध गुन्हाभाजपचे सांगलीतील उमेदवार संजयकाका पाटील यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आणल्यास पाच लाख रुपये देण्याची घोषणा करणारे सांगली भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.
१५० वाहने ताब्यातविदर्भात ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी वाहने निवडणूक कामासाठी दिली नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरू असून, आतापर्यंत १५0 वाहने आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.