नवी दिल्ली- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वाईट परिस्थितीत असून, रुपया प्रतिडॉलर 74 रुपयांजवळ पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयानं गाठलेली ही आतापर्यंतची सर्वात खालची पातळी आहे. यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरानं तणाव घेण्याची गरज नाही. ही आपली सुवर्णकाळाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले आहेत. गेल्या 15 वर्षांतला भारतीय रुपयासाठी हा सर्वात चांगला काळ आहे. पीयूष गोयल हे हिंदुस्तान लीडरशिप समीटमध्ये बोलत होते.समीटमध्ये अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवर गोयल म्हणाले, किरकोळ घसरणीनंतर रुपया मजबूत झाला आहे. गेल्या 5 वर्षांत रुपयाच्या मूल्यात फक्त 7 टक्के कपात झाली आहे. सध्याची स्थिती भारतीय रुपयासाठी फार चांगली आहे. रुपयाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असताना पीयूष गोयल यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशातून होणाऱ्या वारेमाप तेलाच्या आयातीमुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणले होते. भाजपा या दोन्ही मंत्र्यांची विधानं एकमेकांशी विसंगत आहेत. चलन बाजारात रुपयाने डॉलरसमोर शरणागती पत्करली असतानाच 74च्या नीचांकी स्तराला स्पर्श केला आहे.खनिज तेलाची आयात करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. भारतातील एकूण आवश्यकतेपैकी 80 टक्के खनिज तेल हे आयात केले जाते. त्यातच या वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये 13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीवर होणारा खर्चही वाढला आहे. तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे पसिस्थिती अधिकच बिघडली आहे.
रुपया गेला ७४ पार; तरीही गोयल म्हणतात, 'हा तर सुवर्णकाळ'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 6:35 PM