पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात युक्रेन दौऱ्यावर जात आहेत. यापूर्वीच भारताने रशिया आणि युक्रेन दरम्यान मध्यस्थीची भूमिका बजावण्यास नकार दिला आहे. मात्र, आपण दोन्ही देशांदरम्यान संदेश पाठविण्यास मदत करू शकतो, असे नवी दिल्लीने म्हटले आहे. पीएम मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत.
महत्वाचे म्हणजे, फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, एखाद्या मोठ्या भारतीय नेत्याचा हा पहिलाच दौरा आहे. एवढेच नाही तर, 1991 मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतरही, एखाद्या भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलाच युक्रेन दौरा असेल.
युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येरमाक यांनी भारतासंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी एक मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, पंतप्रदान नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. मात्र, अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की, भारताने दोन्ही देशांत प्रत्यक्ष मध्यस्थीची भूमिका पार पाडण्यास नकार दिला आहे. तसेच नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हटले आहे की, भारत दोन्ही देशांमध्ये संदेश वहनाचे काम नक्कीच करू शकतो.
रशिया-युक्रेन युद्धात भारताची भूमिका काय? -भारताने युक्रेन संदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या बहुतांश ठरावांविरोधात मतदान केले आहे अथवा त्यात भागच घेतलेला नाही. रशिया आणि युक्रेनने संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने पुढे जावे. तसेच कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला जाईल. युद्धातून तोडगा निघणार नाही, असे भारताचे म्हणणे आहे.