ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - रशिया, चीन आणि पाकिस्तान इसिसच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या तालिबान्यांचा वापर करून घेण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र त्यामुळे भारतासोबत रशियाचे असणा-या मैत्री संबंधांवर विपरीत परिणाम होणार आहेत. चीन, रशिया आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींची यासंदर्भात मॉस्कोमध्ये नुकतीच एक भेट झाली. यावेळी अफगाणिस्तानमध्ये बिघडत असलेल्या परिस्थितीसंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र या तीन देशांच्या भेटीवर अफगाणिस्तान सरकारनं निषेध व्यक्त केला आहे. यावेळी या तिन्ही देशांनी ही चर्चा थांबवून पुढच्या वेळी अफगाणिस्तानलाही सामील करून घेण्याचा विचार व्यक्त केला. इराणलाही या गटात येण्यासाठी या तिन्ही देशांचे आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. रशियन विश्लेषक आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या नंदन उन्नीकृष्णन यांच्यामते, भारत आणि रशियादरम्यान संवाद मर्यादित स्वरूपात आहे. मात्र रशियाच्या या कारवाईमुळे भारतासोबत रशियाचे संबंध बिघडू शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतानं रशियाकडून जवळपास 10 मिलियन डॉलरची युद्धसामग्री खरेदी केली आहे. तसेच रशिया आणि चीनलाही काबूल आणि तालिबान्यांमध्ये शांती चर्चा हवी आहे, असंही बैठकीनंतर निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चर्चेत भारताची अनुपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. भारत नेहमीच तालिबान्यांच्या विरोधात अफगाणिस्तानसोबत आहे. भारत, अफगाण सरकार आणि अमेरिकेचंही तालिबान्यांविरोधात एकमत झालं आहे.
रशिया, चीन आणि पाकिस्तानची हातमिळवणी, भारताकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 29, 2016 2:56 PM