नवी दिल्ली - रशिया मागील काही काळापासून भारतानं अफगान क्वाडमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. आतापर्यंत या क्वाडमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतानेही त्याचा भाग व्हावं असं रशियाला वाटते. परंतु या क्वाडमध्ये भारताच्या समावेशाला मोठी आव्हाने आहेत असं तज्ज्ञांनी सांगितले. अफगान क्वाडमध्ये याआधीच पाकिस्तानचा सहभाग आहे त्यामुळे भारताचा यापासून दूर राहण्याचा इरादा आहे.
रशियाच्या प्रभावाखाली या चार देशांनी क्वाडची स्थापना करत अफगाणिस्तानात स्थिरता आणि प्रादेशिक हितांचे लक्ष साधण्याचा हेतू ठेवला आहे. अलीकडेच रशियाचे परराष्ट्र मंत्रई सर्गेई लावरोव्ह यांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यात ते म्हणाले होते की, भारताने या क्वाडचा हिस्सा बनू शकते. अफगाणिस्तानात त्यांच्या भूमिका वाढवण्यासाठी भारताचं असं करणे योग्य पाऊल ठरेल असं त्यांनी म्हटलं.
भारतासाठी पाकिस्तान बनला रेड सिग्नल
भारताकडून अफगान क्वाडमध्ये सहभागाबद्दल अधिकृतपणे काही निवेदन आले नाही. परंतु तज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली आहेत. या क्वाडमध्ये पाकिस्तानचं आधीच असणं भारतासाठी रेड सिग्नल आहे. पाकिस्तानने नेहमी अफगाणिस्तानात तालिबानीचं समर्थन केले जे एकप्रकारे भारत आणि अमेरिकेच्या हिताविरोधात आहे. जर या ४ देशांना भारताला या क्वाडमध्ये सहभागी करून घ्यायचे असेल तर सर्वात आधी पाकिस्तानला स्वत:त बदल करावे लागतील. अफगाणिस्तानची स्थिरता रशिया आणि भारताच्या प्रादेशिक हिताची आहे. जर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध खराब राहिले तर रशियाच्या या क्वाडमध्ये सहभागी होण्याच्या ऑफरवर भारत सकारात्मक विचार करू शकतो.
रशियाकडून भारताला क्वाडमध्ये सहभागी होण्याची ऑफर अशावेळी आलीय जेव्हा काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींनी दुबईत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतली होती. याआधी तालिबान, पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले असले तरी सध्या अफगाणिस्तान सरकारचं पाकिस्तानशी जुळत नाही. या दोन्ही देशात वाद वाढतोय. त्यातच भारताने या क्वाडमध्ये सहभागी होण्याचा सकारात्मक विचार केला तर भारत केवळ अफगाणिस्तानचा मानवतावादी मित्र बनणार नाही तर प्रादेशिक शक्ती म्हणून भारताची विश्वासार्हता देखील मजबूत होईल असं तज्ज्ञ सांगतात.