नवी दिल्ली:रशियाने भारताला जमिनीवरुन हवेत मारा करणारे S-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा सुरू केला आहे. S-400 च्या पुरवठ्यासाठी रशिया आणि भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये करार केला होता. हे क्षेपणास्त्र 4 वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून, 400 किमी अंतरावरील शत्रूच्या युद्धनौका, ड्रोन, विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर मारा करण्यास सक्षम आहे. भारताच्या पश्चिम सीमेजवळ या क्षेपणास्त्र प्रणालीला तैनात केले जाईल, तेथूनचे याद्वारे पाकिस्तान आणि चीनच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील हल्ल्यांचा सामना करण्यास मदत मिळेल.
फेडरल सर्व्हिस फॉर मिलट्री टेक्निकल कोऑपरेशन(FSMTC) चे संचालक दिमित्री शुगाएव म्हणाले की, भारताला S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा पुरवठा वेळेवर केला जात आहे. FSMTC ही रशियन सरकारची मुख्य संरक्षण निर्यात संस्था आहे. सध्या S-400 चा वापर चीन आणि तुर्कीमध्ये होत आहे.
भारतासाठी S-400 क्षेपणास्त्रे का महत्त्वाची आहेत?
ही क्षेपणास्त्र प्रणाली एकाच वेळी 36 ठिकाणांना लक्ष्य करू शकते. या प्रणालीला एका ट्रकवर फीट केले जाते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येते. अमेरिकेकडेही या क्षेपणास्त्रांचा सामना करणारी कोणतीही क्षेपणास्त्रे नाहीत. ही रशियन बनावटीची S-200 क्षेपणास्त्रे आणि S-300 क्षेपणास्त्रांची चौथी आणि अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे.
भारत पाच S-400 खरेदी करत आहेस्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या मते, S-400 ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. त्यात बसवलेले प्रगत रडार 400 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य पाहून ते नष्ट करू शकते. भारत रशियाकडून पाच S-400 संरक्षण प्रणाली खरेदी करत आहे. भारतीय लष्कराचे तज्ज्ञ या वर्षी जानेवारीपासून रशियामध्ये ही यंत्रणा चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रणालीसाठी भारताने 2019 मध्ये रशियाला $800 मिलियन दिले होते. संपूर्ण डील सुमारे 35,000 कोटी रुपयांची आहे.