नवी दिल्ली - युक्रेनमधून ऑपरेशन गंगा या मोहिमेतंर्गत देशातील नागरिकांची देशवापसी करण्यात येत आहे. जवळपास 18 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात भारत सरकारला यश आलं आहे. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मुलांच्या चिंतेत असलेल्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. आजही राजधानी दिल्ली विमानतळावर आपल्या पाल्यांना घेण्यासाठी पालक पोहोचले होते. त्यावेळी, श्रीनगरच्या एका पित्यास अश्रू अनावर झाले. तर, मोदींमुळेच माझा मुलगा परत आला, असेही त्यांनी बोलून दाखवले.
मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय. कारण, मोदींनी माझ्या मुलास भारतात परत आणलंय. आम्हाला आशाच नव्हती, सुमी शहरात जी परिस्थिती पाहात होतो. त्यावरुन, आम्ही आशाच सोडून दिली होती. मी भारत सरकारचे आभार मानतो, त्यांनी माझा मुलगा मला परत मिळवून दिला, असे म्हणत काश्मीर निवासी संजय पंडिता यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. संजय यांचा मुलगा ध्रुव हा युक्रेनच्या सुमी शहरात अडकला होता.
दरम्यान, युक्रेनमधून सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडले असून, ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ पेक्षा अधिक फेऱ्यांद्वारे १० हजारांपेक्षा जास्त भारतीयांना परत आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय वायू सेनेकडून आणि इतर विमानांच्या फेऱ्या करण्यात येत आहे. आज दिल्ली विमानतळावर काही विमानांचे लँडींग झाले. त्यावेळी, मुलांना पाहून पालक भावूक झाले होते.