रशिया-युक्रेनमधील युद्ध कसं थांबवायचं? PM नरेंद्र मोदींनी व्लादिमीर पुतीन यांना फोन करून दिला सल्ला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:37 PM2024-03-20T17:37:06+5:302024-03-20T17:40:37+5:30
Narendra Modi & Vladimir Putin: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून त्यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध कसं थांबवता येईल, याबाबतही मोदींनी पुतीन यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून त्यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध कसं थांबवता येईल, याबाबतही मोदींनी पुतीन यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर तोडगा काढता येईल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यामधील प्रगतीची समीक्षा केली. तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरील मतांची देवाण-घेवाण केली.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. त्याबाबत मोदींनी पुतीन यांचं अभिनंदन केलं. तसेच रशियाची प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान, रणनीतिक भागीदारी अधिक भक्कम करण्याच्या दिशेने प्रभावी पावलं उचलण्याबाबतही सहमती दर्शवली.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत आज चर्चा केली. तसेच रशियाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारत आणि रशिया यांच्यामध्ये विशेषाधिकार प्राप्त रणनीतिक भागीदारीला आणखी विस्तारित करण्यासाठी एकत्र मिळून काम करण्याबाबत आमच्यामध्ये एकमत झालं. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
रशियामध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांचा हा पाचवा कार्यकाळ असेल. डिसेंबर १९९९ पासून पुतीन हे राष्ट्रपती किवा पंतप्रधान म्हणून रशियाचं नेतृत्व करत आहेत.