लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनमधून सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडले असून, ‘ऑपरेशन गंगा’द्वारे आतापर्यंत ४८ फेऱ्यांद्वारे १० हजार ३०० भारतीयांना परत आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शनिवारी भारतीय वायू सेनेकडून ४, तर इतर विमानांच्या ११ फेऱ्या हाेणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले, खारकिव्हमध्ये सुमारे ३००, तर सुमी येथे ७०० भारतीय सध्या अडकलेले आहेत. पूर्व युक्रेनमधील संघर्षमय भागातून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यास आमचे प्राधान्य आहे. भारतीयांना बाहेर काढता यावे, यासाठी मार्ग काढण्याबाबत आम्ही दाेन्ही देशांना सातत्याने विनंती करीत आहाेत. स्थानिक युद्धबंदी हा पर्याय असू शकताे. भारताने पहिली ॲडवायजरी जारी केल्यानंतर सुमारे २० हजार भारतीय बाहेर पडले आहेत.
भारतीयांना आणण्यासाठी शुक्रवारी इंडिगो कंपनीचे विमान युक्रेनच्या शेजारी देशांत रवाना केले आहे. तिथे रविवारपर्यंत या कंपनीच्या विमानांच्या १२ फेऱ्या होणार आहेत. २८ फेब्रुवारीपासून इंडिगोची विमाने भारतीयांना आणण्यासाठी रोमानिया, पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया, पोलंड या ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली. आजवर इंडिगोच्या ३० विमान फेऱ्या झाल्या असून, त्यातून काही हजार लोकांना मायदेशात आणण्यात आले आहे.
रशिया विरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला मदत म्हणून जपान बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट व इतर लष्करी साहित्य पाठविणार आहे. युद्धात सहभागी असलेल्या देशांना लष्करी साहित्य न पुरविण्याची भूमिका बाजूला सारून जपानने हा निर्णय घेतला आहे.