Russia-Ukraine Conflict: ॲापरेशन गंगा: आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल; आता वायुसेनाही होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:28 AM2022-03-02T05:28:48+5:302022-03-02T05:29:51+5:30
Russia-Ukraine Conflict: रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशियाचे हल्ले तीव्र झाल्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहेत. वायुसेनेचे सी-१७ ग्लाेबमास्टर हे भव्य विमान पाठविण्यात येणार आहे. अफगाणिस्तानातील संघर्षादरम्यान या विमानाद्वारे एकाच वेळी ६४० जणांना सुखरूप परत आणण्यात आले हाेते.
ऑपरेशन गंगा माेहिमेतील आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन हंगेरीच्या बुडापेस्ट येथून नवी दिल्लीत दाखल झाले, तर नववे विमान २१८ भारतीयांना घेऊन बुखारेस्ट येथून नवी दिल्लीकडे झेपावले. आतापर्यंत ८ विमानांद्वारे १,८३६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे.
रशियाकडून हल्ले आणखी तीव्र, ७० युक्रेनी सैनिकांचा मृत्यू
रशियाने कीव्ह आणि खारकीव्ह जवळच्या ओख्तिरका शहरातील लष्करी तळावर हल्ला केला. या ठिकाणी ७० युक्रेनी सैनिक ठार झाले आहेत. रशियाने युद्धात प्रतिबंधित शस्त्रांचा वापर केल्याचा आराेप युक्रेनने केला आहे. रशियाने व्हॅक्युम बाॅम्बचा वापर केल्याचा दावा केला असून, पारंपरिक शस्त्रापेक्षा हा ७ ते ८ पट घातक बाॅम्ब आहे.
कीव्हच्या दिशेने रशियाचा ६५ किलाेमीटर लांब लष्करी ताफा
कीव्ह आणि खारकीव्हसाेबतच रशियाने चर्निहाईव्हमध्ये ताेफांचा वापर करून तीव्र हल्ले केले आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात रशियन सैन्याचे रणगाडे, ट्रक व इतर लष्करी वाहनांचा ६५ किलाेमीटर लांब ताफा दिसून आला. हा ताफा कीव्हपासून २७ किलाेमीटर अंतरावर एंटाेनाेव्ह विमानतळाजवळ पाेहाेचला आहे.
चर्चेशिवाय पर्याय नाही : भारताची भूमिका
- युक्रेनमधील बिघडणाऱ्या परिस्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये चिंता व्यक्त केली असून, तातडीने हिंसाचार थांबवून चर्चेद्वारे प्रश्न साेडविण्याचे आवाहन केले. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्राच्या आपत्कालीन बैठकीत सांगितले, की हिंसाचार साेडून चर्चेच्या मार्गावर येण्याशिवाय पर्याय नाही.
- भारतीयांना तेथून सुरक्षितपणे परत आणण्यास आमची सर्वाेच्च प्राथमिकता आहे; परंतु विविध सीमांवरील परिस्थितीमुळे बचाव माेहिमेवर परिणाम हाेत आहे. याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे तिरुमूर्ती म्हणाले.