Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियामार्गे एअरलिफ्ट, एअर इंडियाची 2 विमाने उद्या रवाना होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:28 PM2022-02-25T17:28:14+5:302022-02-25T17:42:48+5:30
Russia Ukraine Conflict : ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट (AIRLIFT) करणार आहेत.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. या लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट (AIRLIFT) करणार आहेत.
आधीच भारतीय बचाव पथके रोमानियाच्या सीमेवर पोहोचली आहेत, तेथून युक्रेनची राजधानी कीव्ह येथे फक्त 12 तासांच्या ड्रायव्हिंगने पोहोचता येते. बचाव पथक भारतीय लोकांना बुखारेस्टला आणणार आहे. त्यानंतर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी बुखारेस्ट येथून विशेष विमाने असणार आहेत.
Two flights to Bucharest in Romania today and one flight to Budapest in Hungary tomorrow are being planned to be operated as GoI chartered flights: Government sources#UkraineRussiaCrisis
— ANI (@ANI) February 25, 2022
गुरुवारी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले होते की भारत सरकार तेथे अडकलेल्या जवळपास 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. युक्रेनमध्ये हवाई उड्डाण बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी अनेक भारतीय नागरिकांनी कीव्हमधील भारतीय दूतावासात आश्रय घेतला. दूतावासाच्या परिसरात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय दूतावासाने भारतीय लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांना लवकरच पर्यायी मार्गाने बाहेर काढण्याची योजना आखली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.