लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसमाेरील संकट वाढले आहे. युक्रेनमधून पाेलंडमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सीमेवर युक्रेनी सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात येत आहे. एका ठिकाणी सुरक्षारक्षकांनी हवेत गाेळीबार केल्याचा व्हिडिओ समाेर आला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये युक्रेनची बाजू न घेतल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना आता सीमेवर हाेणाऱ्या मारहाणीसाेबतच युक्रेनमधील अन्नधान्याची टंचाई आणि हाडे गाेठविणाऱ्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे.
युद्धामुळे युक्रेनमधून पाेलंड आणि हंगेरी या देशांमध्ये स्थलांतर करण्यासाठी भारतीयांसह हजाराे युक्रेनी नागरिकही सीमेवर धडकले आहेत. मात्र, युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी भारतीयांना पाेलंडची सीमा पार करू देण्यात अडचणी निर्माण केल्या असून काही जणांना बेदम मारहाण केली आहे. साक्षी इजनकर या विद्यार्थिनीने या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. तिने सांगितले, की पाेलंडच्या सीमेवर आम्हाला युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी घेरले हाेते. तेथून केवळ युक्रेनच्या नागरिकांना पाेलंडमध्ये प्रवेश देण्यात येत हाेता. खूप विनवणी केल्यानंतर मुलींना साेडण्यात आले. मात्र, त्यानंतर पाेलिसांनी भारतीय मुलांना बेदम मारहाण केली. केरळच्या ॲंजेल नावाच्या विद्यार्थिनीनेही हाच अनुभव सांगितला. तिला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. अशा प्रकारच्या मदतीची आम्हाला अपेक्षा नाही, असे ती म्हणाली.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
एका सीमेवर रात्रीच्या सुमारास युक्रेनचा सुरक्षारक्षक भारतीय विद्यार्थ्यांना लाथ मारतानाचा व्हिडीओ फेसबुकवर पाेस्ट करण्यात आला आहे. त्यात ताे संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताने युक्रेनच्या बाजूने मतदान का केले नाही, याचा जाब भारतीय दूतावासाला विचारायला सांगत असल्याचे ऐकू येत आहे.
१५ हजार जणांना आणण्याचे आव्हान
युक्रेनमधून केवळ ९०० विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. अजूनही १५ हजार जणांना मायदेशी आणायचे आहेत. सीमेवर आताच विद्यार्थ्यांना मारहाण व भेदभाव हाेत आहे. हाडे गाेठविणारी थंडी आहे, खाण्यापिण्याची टंचाई आहे. त्यामुळे ही माेहीम किती बिकट राहणार आहे, याचा अंदाज येऊ शकताे.
२४ तासांमध्ये ९०० भारतीय मायदेशी, मायभूमीवर पाय ठेवताच विद्यार्थी आनंदले
- रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची तीव्रता वाढत असतानाच विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याची माेहीम ‘ऑपरेशन गंगा’ गतिमान झाली आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये चार विमाने राेमानिया आणि हंगेरीतून भारतात परतली असून ९०७ विद्यार्थी मायदेशी सुखरूप परतले आहेत.
- राेमानियातील बुखारेस्ट येथून पहिले विमान शनिवारी २१९ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले हाेते.
- रविवारी पहाटे बुखारेस्ट आणि हंगेरीतील बुडापेस्ट येथून २५० व २४० विद्यार्थ्यांना घेऊन दाेन विमाने दिल्ली येथे उतरली तर १९८ भारतीयांना घेऊन चाैथे विमान बुखारेस्ट येथून संध्याकाळी ६ च्या सुमारास दिल्लीत उतरले.
- मायभूमीवर पाय ठेवताच विद्याथ्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया यांनी दिल्ली येथे परतलेल्या भारतीयांचे स्वागत करुन त्यांना दिलासाही दिला.
कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे हाल
- हंगेरी आणि पाेलंडच्या सीमेवर शून्याहून कमी तापमानात कडाक्याच्या थंडीत भारतीय विद्यार्थ्यांचे हाल हाेत आहेत.
- विद्यार्थी ३० ते ३५ तासांपासून सीमेवर अडकले आहेत. त्यांना सीमा पार करण्याची परवानगी देण्यात येत नाही.
- याबाबत भारतीय आणि हंगेरीच्या दूतावासाने सूचना जारी केल्या असून त्यानुसार भारतीयांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, माेठ्या संख्येने विद्यार्थी सीमेवर पाेहाेचू लागल्याने अडचण निर्माण हाेत आहे.
- युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना भुयारी रेल्वे, इमारतींची तळघरे इत्यादी ठिकाणी आसरा देण्यात आला आहे. मात्र, खाण्यापिण्याच्या साहित्याचे रेशनिंग करण्यात आले आहे. मर्यादित स्वरुपात ब्रेड व इतर साहित्य देण्यात येत आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.