Russia-Ukraine Conflict: सरकारच्या मदतीने मायदेशात आलो; युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांची आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:38 AM2022-02-28T05:38:29+5:302022-02-28T05:40:16+5:30
Russia-Ukraine Conflict: केवळ नशीब आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे आम्ही मायदेशात येऊ शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी रविवारी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनमधील स्थिती दिवसेंदिवस खराब होत असून केवळ नशीब आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे आम्ही मायदेशात येऊ शकलो, अशी भावनिक प्रतिक्रिया बहुतेक विद्यार्थ्यांनी रविवारी व्यक्त केली.
रविवारी पहाटे दोन विमानांनी जवळपास ४९० विद्यार्थी रोमानियामार्गे नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. यात महाराष्ट्रातील ४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बहुतेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मायदेशात सुखरूप पोहोचल्याची कृतज्ञतेची भावना होती. युक्रेनमधून हे विद्यार्थी रोमानिया व पोलंडच्या सीमेवर गेले. तेथून त्यांनी नवी दिल्लीला प्रस्थान केले. यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे गेलेले आहेत.
तेथे वैद्यकीय शिक्षण कमी खर्चात होत असल्याने बहुतेक विद्यार्थी रशिया, युक्रेन या देशांना पसंती देतात. नवी दिल्लीत आल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र सदनात निवासाची व जेवणाची व्यवस्था केली आहे. येथून त्यांच्या गावाला जाण्याची व्यवस्थासुद्धा राज्य सरकारने केली आहे. राज्य सरकारने केलेल्या मदतीबद्दलही या विद्यार्थ्यांनी आभार मानले. नागपूरची प्रतीक्षा जाधव म्हणाली, मायदेशात परत आल्याचा खूप आनंद आहे. तेथील स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. अजूनही माझे काही मित्र अडकलेले आहेत. ते सुखरूप मायदेशात यावेत, अशीच माझी प्रार्थना आहे. प्रतीक्षा तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
उर्वरित विद्यार्थीही सुरक्षित येतील
- पुण्याचा रोशन गुंजाळ म्हणाला, आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. परंतु काही विद्यार्थ्यांना पोलंडच्या सीमेवर मारहाण होत असल्याची माहिती मिळाली आहे.
- पोलंड व रोमानियाच्या सीमेपर्यंत येणे व या देशांची सीमा पार करून विमानतळापर्यंतचा प्रवास हा खूप मनाची परीक्षा पाहणारा असतो.
- आम्ही विद्यार्थी सुखरूप आलो व उर्वरित विद्यार्थीसुद्धा सुरक्षित येतील, असा विश्वास आहे. आम्ही आता ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करू, असेही रोशन म्हणाला.
- यावेळी काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारने आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. या विद्यार्थ्यांनी सरकारने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.