मैत्री निभावली! युक्रेनमध्ये अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याची मदत; सुखरुप बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:31 AM2022-03-16T08:31:45+5:302022-03-16T08:33:16+5:30

Russia Ukraine Conflict: युक्रेनच्या हद्दीतून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्याने प्रथमच मदत केल्याचे सांगितले जात आहे.

russia ukraine conflict for a first time russian army help evacuate indians from kherson ukraine | मैत्री निभावली! युक्रेनमध्ये अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याची मदत; सुखरुप बाहेर काढले

मैत्री निभावली! युक्रेनमध्ये अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याची मदत; सुखरुप बाहेर काढले

Next

नवी दिल्ली: गेल्या सुमारे २० दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाकडून अद्यापही युक्रेनच्या विविध प्रांतांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. युक्रेनही माघार घेण्यास तयार नसून रशियाला प्रत्युत्तर देत आहे. अशातच रशियाने भारताशी असलेली मैत्री निभावल्याची घटना समोर आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याने पुढाकार घेत मोलाची मदत केली असून, त्यांना सुखरुप बाहेर काढले आहे. रशिया-युक्रेन संघर्षात प्रथमच रशियन सैन्याने भारतीयांची मदत केल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ताब्यात घेतलेल्या दक्षिण युक्रेनच्या खेरसन शहरात अडकलेल्या तीन भारतीयांना रशियन सैन्याच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या तीन भारतीयांमध्ये एक विद्यार्थी आणि दोन व्यावसायिक असल्याची माहिती मिळाली असून, त्यांना सिम्फेरोपोल (क्राइमिया) आणि मॉस्को मार्गे बाहेर काढण्यात आले. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. 

चेन्नई आणि अहमदाबादमधील रहिवासी

भारताच्या मॉस्को दूतावासातील एका अधिकाऱ्यांने मंगळवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आम्ही या तीन भारतीयांची सिम्फेरोपोलला जाणाऱ्या बसेसच्या ताफ्यात बसण्याची सोय केली. यानंतर त्यांना ट्रेनने मॉस्कोला आणण्यात आले. मॉस्कोला आल्यानंतर भारतीय विमानातून त्यांना मायदेशी पाठवण्यात येत आहे. यामधील विद्यार्थी चेन्नईचा रहिवासी असून, दोन व्यापारी अहमदाबादचे रहिवासी आहेत. तत्पूर्वी, युक्रेनच्या हद्दीतून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्याने प्रथमच मदत केली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक भारतीयांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर, भारतातून पाठवलेल्या विशेष विमानांमधून १७ हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. 

पूर्वेकडील सीमेतून बाहेर पडण्याची पहिलीच वेळ

युक्रेन आणि रशियाने शस्त्रसंधीच्या वचनबद्धतेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे भारतीय सुखरुपपणे बाहेर पडू शकले. बहुतांश भारतीय पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक मार्गे पश्चिम सीमेवरून बाहेर पडले. मात्र, पूर्वेकडील सीमेवरुन रशिया मार्गे भारतीय बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्च अधिकार्‍याने सांगितले की, ०३ मार्च रोजी रशियन सैन्याने खेरसनच्या संपूर्ण प्रदेशाचा ताबा घेतला आणि त्यानंतर तेथील महत्त्वाच्या शहरांवरही नियंत्रण मिळवले. 

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऑपरेशन गंगामध्ये सहभागी असलेल्या संबंधितांशी संवाद साधला. युक्रेन, पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि हंगेरी येथील भारतीय समुदाय आणि खाजगी क्षेत्राच्या प्रतिनिधींनी निर्वासितांच्या मोहिमेचा भाग होण्याबाबत त्यांचे अनुभव शेअर केले. तसेच या मोहिमेत योगदान देण्याची संधी मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले. ऑपरेशनच्या यशस्वी होण्यासाठी काम करणाऱ्या भारतीय समुदायाचे नेते, स्वयंसेवक गट, कंपन्या, व्यक्ती आणि सरकारी अधिकारी यांचे पंतप्रधानांनी कौतुक केल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदींनी युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या नेत्यांशी केलेल्या वैयक्तिक संभाषणाबाबत सांगितले. सर्व परदेशी सरकारांकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत कृतज्ञताही व्यक्त केली.
 

Web Title: russia ukraine conflict for a first time russian army help evacuate indians from kherson ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.