नवी दिल्ली : भारत व युक्रेनदरम्यान चालविल्या जाणाऱ्या विमानांच्या संख्येवरील निर्बंध केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याने हटविले आहेत. रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात परत येणे सुलभ होण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला. मात्र, युक्रेनमधून भारतीयांना तातडीने मायदेशी आणण्याचा सध्या विचार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. युक्रेनच्या सीमेवर आणखी सात हजार जवान तैनात केल्यामुळे तणावात भर पडली आहे.
युक्रेनवर युद्धाचे सावट निर्माण झाल्याने तेथील भारतीयांनी काही काळासाठी तो देश सोडावा, अशी सूचना भारताने केली आहे. कोरोना साथीच्या काळात एअर बबल व्यवस्थेच्या अंतर्गत अन्य देशांबरोबरच भारताने युक्रेनशीही करार केला होता. काही निर्बंध लागू करूनच ही हवाई वाहतूक व्यवस्था सुरू होती. केंद्र सरकारने सांगितले की, युक्रेनमधील भारतीयांना तातडीने मायदेश परत आणण्याचा सध्या कोणताही विचार नाही. काही मोठा प्रसंग घडला तरच अशी पावले उचलण्यात येतील. त्या देशातील भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.
हजारो भारतीय विद्यार्थी, कर्मचारी यांना युद्ध झाल्यास किंवा त्याआधी मायदेशात आणण्यासाठी हवाई वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारने हटविले. या मार्गावर आता चार्टर्ड विमानही उड्डाण करू शकणार आहे. रशियाने लष्कराच्या काही तुकड्या युक्रेन सीमेवरून मागे घेतल्या होत्या. मात्र, आता आणखी सात हजार सैनिक या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. रशियाच्या या पवित्र्यामुळे तणावात आणखी भरच पडली आहे.
भारत आम्हाला नक्की पाठिंबा देईल : अमेरिकायुक्रेनवर रशियाने आक्रमण केले तर भारत अमेरिकेच्या बाजूने उभा राहील, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली आहे. त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नील प्राईस यांनी सांगितले की, क्वाड परिषदेमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत युक्रेन व रशियामधील संघर्षावर सविस्तर चर्चा झाली.