लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनची राजधानी कीव्ह आणि खारकीव्ह येथील युद्धस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. रशियन सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात खारकीव्ह येथे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नवीन शेखरप्पा ज्ञानगाैदर, असे त्याचे नाव असून ताे मूळचा कर्नाटकच्या हवेली जिल्ह्यातील चलागिरी येथील रहिवासी हाेता, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
रशियन हल्ल्यामुळे दाेन्ही शहरांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे सर्व भारतीयांना रेल्वे किंवा बसद्वारे तत्काळ बाहेर पडण्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. नवीनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वडील शेखरप्पा आणि कुटुंबीयांना माेठा धक्का बसला. दिवसातून दाेन ते तीन वेळा ते त्याच्याशी बाेलत. मंगळवारी सकाळीच त्याच्याशी वडिलांचे व्हिडिओ काॅलवर बाेलणे झाले हाेते. तोच त्यांच्यातील अखेरचा संवाद ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या वडिलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांचे सांत्वन केले. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने मार्ग देण्याची मागणी भारताने केली आहे. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला हे रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत.
डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले
२१ वर्षीय नवीन हा खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चाैथ्या वर्षात हाेता. रशियाने खारकीव्हमध्ये मंगळवारी सकाळी भीषण हल्ले केले. नवीनसाेबत वसतिगृहात राहणाऱ्या श्रीधरन श्रीकृष्णन याने सांगितले, की आम्ही वसतिगृहाच्या बंकरमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहाेत. मंगळवारी नवीन किराणा सामान आणण्यासाठी रांगेत उभा होता. त्याचवेळी रशियन सैन्याने लोकांवर बॉम्बहल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. नवीनसाेबतच्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. त्याच गावातील काही विद्यार्थी बंकरमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. भारतात परत आलाे तरच आम्ही वाचू, अशी भीती मुलांना वाटत आहे. पंतप्रधान माेदींनी मुलांना लवकरात लवकर परत आणावे, अशी विनंती पालकांनी केली आहे.
वायुसेनेचे विमान
कमी वेळेत जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वायुसेनेला माेहिमेत सहभागी हाेण्याचे आदेश दिले आहे. वायुसेनेची काही सी-१७ ग्लाेबमास्टर ही भव्य विमाने पाठविण्यात येणार आहेत.
२००० जणांना आणले
ऑपरेशन गंगा माेहिमेत आतापर्यंत ९ विमानांद्वारे २,०१२ भारतीयांना परत आणले आहे. इंडिगाे व एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांद्वारे ६१६ जणांना परत आणले. स्पाईसजेटचे विमान स्लाेव्हाकियाला रवाना झाले आहे. त्यात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून गेले आहेत.
रशिया दहशतवादी राष्ट्र : जेलेन्सकी
खारकीव्हमधील हल्ला हा भ्याड दहशतवादी हल्ला असल्याचा आराेप युक्रेनचे राष्ट्रपती व्हाेलाेदिमिर जेलेन्स्की यांनी केला. जेलेन्स्की यांनी युराेपियन संघाच्या संसदेच्या विशेष सत्रामध्ये व्हर्च्युअल माध्यमातून अतिशय भावनिक भाषणातून युक्रेनची भूमिका मांडली. ते म्हणाले, की हा रशियाचा दहशतवाद आहे. काेणीही माफ करणार नाही, काेणीही विसरणार नाही. आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढत आहाेत. आमच्या नागरिकांना याची किंमत माेजावी लागत आहे. यावेळी उपस्थितांनी जेलेन्सकी यांचे उभे राहून अभिवादन करून त्यांना पाठिंबा दर्शविला.