नवी दिल्ली: विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, या ओळींचा प्रत्यय युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आला आहे. परदेशात भारताच्या तिरंग्याची ताकद काय आहे, हे युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावनांतून समोर येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी भारतात परतले आहेत. भारताचा तिरंगा हाती नसता तर सुखरूप परत आलो नसतो, अशा भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. यातच एअर इंडियाची विमाने हजारो भारतीयांना घेऊन मायदेशात परतत आहेत.
तिरंगा नसता तर आम्ही सुखरूप बाहेर पडलो नसतो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक भारताचा तिरंगी ध्वज असलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे. भारताच्या तिरंगा ध्वजामुळे सुखरूप परत येऊ शकलो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. रिपोर्टनुसार, आग्र्याच्या आदित्य सिंग युक्रेनमध्ये आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना फोनवर सांगितले की, येथे खाण्यापिण्याची समस्या आहे, यापूर्वी भारतीय दूतावासाशी संपर्क होत नव्हता. मात्र, आता संपर्कानंतर सुमारे १५० विद्यार्थी तीन बसमधून रोमानियाला रवाना झाले आहेत.
तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलो
भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा पाहून रशियन सैनिकांनीही मदत केली. त्यांना रोमानियात आणले गेले. युक्रेनमधून परतलेल्या साक्षीने सांगितले की, आम्हाला युक्रेनमध्ये तिरंग्याचे महत्त्व काय आहे हे कळले. तिरंगा तुमच्यासोबत नसेल तर तुमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशा सूचना आम्हाला आधीच मिळाल्या होत्या. आम्हीही तिरंगा घेऊन बाहेर पडलो होतो, त्यामुळे मला सुखरूप परत येता आले, असे साक्षी म्हणाली.