Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोप, अमेरिका प्रवास महागला; उड्डाणे अन्य मार्गे वळविल्याने फेरा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:14 AM2022-03-05T06:14:34+5:302022-03-05T06:15:26+5:30
Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धाची झळ पूर्वेकडील देशांना पश्चिमेला जोडणाऱ्या हवाई सेवेला बसली आहे.
शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धाची झळ पूर्वेकडील देशांना पश्चिमेला जोडणाऱ्या हवाई सेवेला बसली आहे. या दोन्ही देशांनी आपापली हवाई हद्द बंद केल्याने अनेक विमानसेवा कंपन्यांनी अनेक उड्डाणे एक तर रद्द केली आहेत किंवा अन्यमार्गे वळविली आहेत. परिणाम युरोप आणि अमेरिकेपर्यंतचा हवाई प्रवास खूपच महागला असून प्रवासाचे अंतरही वाढले आहे.
अमेरिकी, ब्रिटिश आणि युरोपीयन एअरलाईन्सला रशियाने २५ फेब्रुवारीपासून आपल्या विमानतळांचा आणि हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी केली आहे. युरोपीय संघानेही रशिया, बेलारुस, जॉर्जिया, युक्रेन आणि माल्डोवाचा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे.
तथापि, भारतातून रशियाला एअर इंडिया आणि एअरोफ्लॅाटची उड्डाणे होत आहेत; परंतु, अमेरिकेच्या युनायटेड एअरलाईन्सने मुंबईकडची उड्डाणे रद्द केली आहेत. तुर्कीश एअरलाईन्सची दिल्लीची उड्डाणे रद्द झाली आहेत. रशिया आणि आसपासच्या देशांची हवाई हद्द बंद असल्याने बव्हंशी विमाने इराण, इराक आणि तुर्कीवरून जात आहेत. त्यामुळे प्रवास तीन तासांनी वाढला आहे. शिवाय या हवाईमार्गावर वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे येथे उतरणाऱ्या विमानांना खूप वेळ वाट पाहावी लागते.