लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे. २१९ विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबईत रात्री दाखल झाले. मायभूमीवर पाय ठेवताच सर्वांनी सुटेचा नि:श्वास साेडला. युद्धाच्या छायेतून बाहेर पडल्यानंतर अनेकजण भावुक झाले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले, की एअर इंडियाचे पहिले विमान भारतात दाखल झाले. विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी आमची टीम २४ तास काम करत आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणू, असे त्यांनी सांगितले. पाेलंडमधील भारतीय राजदूत नगमा मलिक यांनीही बचाव माेहिमेबाबत माहिती देताना सांगितले, की दूतावासाने तीन पथके तयार केली आहेत. भारतीयांना पाेलंडमधून भारतात पाठविण्याची साेय करण्यात येईल. दिल्लीतून निघालेले दुसरे विमान बुखारेस्टला सायंकाळी ७च्या सुमारास उतरले.
त्यातून सुमारे २५० विद्यार्थ्यांना आणण्यात येईल. युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पेशल काॅरिडाेर बनविण्यात आला आहे. तेथे त्यांचे लसीकरण किंवा काेराेना चाचणीचे अहवाल व इतर कागदपत्रे तपासण्यात येतील. हजाराे भारतीय पाेलंड, राेमानिया आणि हंगेरीच्या सीमेकडे निघाले आहेत. अनेकजण विनानाेंदणी किंवा माहिती न देता सीमेवर पाेहाेचल्यामुळे अडचणी निर्माण हाेत आहेत. त्यामुळे दूतावास किंवा सीमेवरील भारतीय पथकांसाेबत समन्वयाशिवाय सीमेकडे निघू नका, असे आवाहन दूतावासाने केले आहे.