युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेचे रशियाने स्वागत केले आहे. नवी दिल्ली येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबूश्किन म्हणाले, भारत एक जबाबदार जागतिक शक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. तसेच, भारताने जागतिक घडामोडींमध्ये “मुक्त आणि संतुलित” दृष्टिकोन स्वीकारला आहे, जो प्रशंसनीय आहे.
युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. भारताने वैध सुरक्षा हित लक्षात घेत तणाव कमी करण्यासंदर्भात सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले होते. भारताच्या या स्वतंत्र आणि पारदर्शक भूमिकेचे रशियाने बुधवारी कौतुक केले.
भारत आणि रशिया यांच्यात अतूट विश्वास -बाबुश्किन म्हणाले, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत आणि भक्कम पायावर आधारलेले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये अतूट विश्वास आहे. भारत-रशिया संबंध असेच टिकून राहतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच, आमचे सहकार्य कुणासाठीही धोक्याचे नाही आणि याच वेळी आम्ही न्याय आणि समानतेवर आधारित बहुध्रुवीय जगाची स्थापना करण्यासाठी खांद्याला खांदा लावून चालत आहोत, असेही बाबुश्किन म्हणाले.
युक्रेन संकटासंदर्भात बोलताना रशियन डिप्लोमॅट म्हणाले, पाश्चात्य शक्ती या प्रदेशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि रशियावरील पाश्चात्य निर्बंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होईल.