Russia-Ukraine Conflict: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:19 AM2022-03-04T06:19:32+5:302022-03-04T06:20:21+5:30

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून सुमारे १८ हजार भारतीय बाहेर पडले असून, पैकी ७ हजार मायदेशात परतले आहेत.

russia ukraine conflict sab ka saath to Central Govt to bring back indians resolve all doubts of the opposition | Russia-Ukraine Conflict: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन

Russia-Ukraine Conflict: भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारला ‘सब का साथ’; विरोधकांच्या सर्व शंकांचे निरसन

Next

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ऑपरेशन गंगा मोहीम व अन्य उपाययोजनांची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष सदस्यांना दिली. त्यांच्या सर्व शंकांचेही  निरसन केले. त्यामुळे भारतीयांना परत आणण्याच्या केंद्राच्या चाललेल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 

२१ सदस्य असलेल्या या समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयशंकर होते. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शशी थरूर, आनंद शर्मा यांच्यासह विविध पक्षांचे काही खासदार उपस्थित होते. भारतीय विद्यार्थ्यांना माघारी आणण्याच्या हालचाली उशिरा सुरू झाल्या, असा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर जयशंकर म्हणाले की, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी अभ्यासक्रम अर्धवट सोडून तर भारतात परत जावे लागणार नाही ना या द्विधा मनस्थितीत होते. तसेच तुम्ही सुरक्षित आहात असे युक्रेनकडून त्यांना आश्वासन देण्यात येत होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्येच राहिले. त्यामुळे हाती वेळ असूनही त्यांना भारतात लगेच परत येणे शक्य झाले नाही. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारले की, रशिया-युक्रेनच्या युद्धाचे गांभीर्य ओळखण्यात भारतीय अधिकारी कमी पडले का? रशियाशी चीन व पाकिस्तानने जवळीक साधली आहे. त्याबद्दलही राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रश्नांना परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.  

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र : शशी थरूर

काँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले की, युक्रेनमधून भारतीयांना आणण्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष मोदी सरकारच्या पाठीशी आहेत. राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही सर्व जण एकजुटीने काम करतो. भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन गंगा मोहिमेचे शिवसेना, वायएसआर काँग्रेसनेही कौतुक केले.  

मोदींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

युक्रेनहून परतलेल्या उत्तर प्रदेशातील काही विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. युक्रेनमध्ये आलेले विविध अनुभव विद्यार्थ्यांनी मोदी यांना सांगितले. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान गुरुवारी वाराणसीत आले होते. त्यावेळी या दौऱ्यात खास वेळ काढून त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा इन्कार 

- खार्कीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याच्या आरोपाचा युक्रेन व रशिया या दोन्ही देशांनी इन्कार केला आहे. ओलीस ठेवण्याचा प्रकार घडल्याचा कोणताही अहवाल मिळालेला नाही, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानेही म्हटले आहे. खार्कीव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी विनंती भारताने केली आहे. 

- युक्रेनच्या सैनिकांनी काही भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असून ते त्यांचा वापर मानवी ढालीसारखा करत आहेत, असा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी व पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेप्रसंगीही विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा मुद्दा रशियाने उपस्थित केला होता.

बाहेर पडले १८ हजार; ७ हजार परतले मायदेशात

- युद्धग्रस्त युक्रेनमधून ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत विशेष विमानांनी आतापर्यंत ६९९८ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. तसेच उद्या, शुक्रवारपर्यंत आणखी काही हजार भारतीयांना आणण्यासाठी विमानांच्या १८ फेऱ्या होणार आहेत. 

- युक्रेनमधून सुमारे १८ हजार भारतीय बाहेर पडले आहेत. मात्र भारतीय राजदूतावासाने खारकीव्ह तातडीने सोडण्याची सूचना देऊनही अद्यापही शेकडो भारतीय विद्यार्थी तिथेच असल्याचे कळते.

- ७९८ जण भारतीय हवाई दलाच्या चार विमानांतून गुरुवारी मायदेशात परतले. ही चारही विमाने हिंडन हवाई तळावर पोहोचली. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. बुचारेस्टहून २०० जणांना घेऊन आलेले भारतीय हवाई दलाचे विमान गुरुवारी हिंडन हवाई तळावर उतरले.

Web Title: russia ukraine conflict sab ka saath to Central Govt to bring back indians resolve all doubts of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.