Russia-Ukraine Conflict: “हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:10 PM2022-02-28T12:10:42+5:302022-02-28T12:12:29+5:30
Russia-Ukraine Conflict: देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) अधिकच तीव्र होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारने या मोहिमेला ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. एअर इंडियाच्या विमानातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मायदेशात परतले आहेत. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे नाव देण्यात आल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यासंदर्भातील व्हिडिओ समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. यावर, आतापर्यंत जगात अनेक युद्ध झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते. केंद्रातील मोदी सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच हजारो भारतीय अडकलेले असताना १५० जण मायदेशात परतल्यावर त्याची जाहिरात सुरू आहे, या शब्दांत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातलं पाहिजे
उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत म्हणून ‘ऑपरेशन गंगा’. देशाची मुले संकटात असताना तुम्हाला तिथे निवडणुका आणि प्रचार दिसत आहे. पक्षाचा प्रसार दिसतोय तर त्याला मी राष्ट्रीय बाणा म्हणत नाही. विद्यार्थ्यांचा पालकांचा आक्रोश दिसत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण होत आहे. त्यांच्याकडचे पैसे संपत आले आहेत. त्यांना येण्याचा मार्ग दिसत नाही. या देशात किंवा जगात अशी परिस्थिती कधी उद्भवली नव्हती. सरकारने राजकारण, प्रपोगांडा बाजूला ठेऊन यामध्ये लक्ष घातले पाहिजे. यापूर्वीही अनेक ठिकाणांहून आपण भारतीयांना एअरलिफ्ट केले आहे, असा घणाघात करत, आताच्या घडीला पंजाब किंवा महाराष्ट्रात निवडणुका असत्या, तर त्यानुसार मोहिमेला नाव दिले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १३ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असून, त्यांना शक्य तितक्या लवकर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारताने तेथे अडकलेल्या आपल्या ९०७ नागरिकांना परत आणले आहे, असे सांगितले जात आहे.