रशियाकडून आज युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर युक्रेनकडून हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशियाकडून सातत्यानं लढाऊ विमानांच्या घिरट्या युक्रेनवर सुरू आहेत. तसंच काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धजन्य परिस्थितीत 20 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांची काळीज भारतासह महाराष्ट्राला आहे. त्यासोबतच, लॉकडाऊनचा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदनेही चिंता व्यक्त केली आहे.
युक्रेनमधील परिस्थिती पाहता यथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. तसंच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झालं. पण, आता विमानतळ बंद ठेवण्यात आल्याने भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे, नागरिकांच्या कुटुंबीयांसह, राज्य सरकार आणि भारत सरकारलाही नागरिकांची काळजी लागली आहे. त्यासाठी, सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत.
लॉकडाऊन काळात अडकलेल्या नागरिकांना इच्छितस्थळी, त्यांच्या स्वगृही पाठविण्याचे काम अभिनेता सोनू सूद याने केले होते. तेव्हापासून सोनू सूदचे सामाजिक कार्य वाढतच गेले आहे. आता, सोनूने युक्रेनमध्ये अडकलेल्या 18 हजार भारतीयांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनमध्ये विद्यार्थी आणि कुटुंब मिळून 18 हजार भारतीय नागरिक फसले आहेत. या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, याची खात्री आहे. मी भारतीय परराष्ट्र खात्याला विनंती करतो की, पर्यायी मार्ग शोधावा. या सर्वांच्या सुरक्षेसाठी देवाला प्रार्थना... असे ट्विट सोनूने केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याही सूचना
युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्याही सुखरूप सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. "युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत", अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.