Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध पेटलं, आता तेलाच्या किमतीही पेटणार; तुमच्या किचनला थेट झळ बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:45 PM2022-02-26T15:45:15+5:302022-02-26T15:45:37+5:30
Russia vs Ukraine War: रशिया-युक्रेनच्या लढाईचा परिणाम थेट किचनमध्ये दिसणार; तुमच्या आमच्या घरातील फोडणी महागणार
मुंबई: रशिया-युक्रेन संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. या युद्धाचा परिणाम आता थेट आपल्या स्वयंपाकघरात जाणवणार आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये रिफाईंड तेल, खाद्य तेलाचे दर वाढले. त्यानंतर सरकारनं तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली. मात्र आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे तेलाचे दर पेटणार आहेत.
रशिया-युक्रेनच्या लढाईचा परिणाम खाद्य तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. भारताला आवश्यक असलेल्या एकूण खाद्य तेलापैकी ७० टक्के तेल आयात करावं लागतं. सूर्यफूलाच्या तेलाच्या बाबतीत हे प्रमाण आणखी जास्त आहे. रशिया-युक्रेनचं युद्ध पुढील ७ ते १० दिवसांमध्ये न थांबल्यास खाद्य तेलांच्या किमतीत वाढ होईल.
आम्ही रशिया-युक्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती देशातील सर्वात मोठी खाद्य तेल कंपनी असलेल्या अदानी विल्मारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अंगशु मलिक यांनी सांगितलं. रशिया आणि युक्रेनच्या माध्यमातून सूर्यफूल तेलाची ९० टक्के गरज भागते. सगळ्या तेलांचा विचार केल्यास सूर्यफूल तेलावरील आपलं अवलंबित्व जवळपास १५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुढील ७ ते १० दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर आल्यास दर सामान्य राहतील, असं मलिक म्हणाले.
तेल आयात करणाऱ्या कंपन्यांकडे ४५ दिवसांचा साठा असतो. तेल उत्पादक कंपन्यांकडेही साठा उपलब्ध असतो. पण युद्ध पुढील काही दिवस सुरू राहिल्यास तेलाच्या कंपन्या बंद राहतील. तेलाची वाहतूक करणारी जहाजं उपलब्ध न झाल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल आणि त्याचे परिणाम एप्रिलमध्ये दिसतील, असं मलिक यांनी सांगितलं.