नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणण्यात आले असून, आजही युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे(jyotiraditya scindia) यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, 'ऑपरेशन गंगा अंतर्गत, बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रज्जो येथून 3 फ्लाइटने 3726 भारतीयांना आज घरी आणले जाणार आहे."
विद्यार्थ्यांनी सरकारचे मानले आभार युक्रेनमधून सुटका करुन गुरुवारी दिल्ली विमानतळावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे आभार मानले. भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी तातडीने कारवाई केली. भारतीय असल्याचा अभिमान आहे. तर, भारतीय विद्यार्थिनी उज्जला गुप्ता युद्धग्रस्त युक्रेनमधून सुखरूप मायदेशी परतल्यावर दिल्ली विमानतळावर तिचे पालक आणि नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले. तिनेही भारत सरकारचे आभार मानले.
'ऑपरेशन गंगा'मध्ये भारतीय वायुसेना सहभागीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला 'ऑपरेशन गंगा'मध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. भारतीय हवाई दल त्यांच्या मालवाहू आणि वाहतूक विमानांसह बचाव कार्य करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, C-17 ग्लोबमास्टर आणि IL-76 विमाने एका वेळी सुमारे 400 प्रवाशांसह लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहेत. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर वाहतूक विमानाने काबूलमधून नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आतापर्यंत सुमारे 17000 भारतीयांनी युक्रेन सोडले आहेकीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी केल्यापासून आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत. युक्रेन सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही भारतीयांचा समावेश आहे ज्यांनी यापूर्वी कीवमधील भारतीय दूतावासात नोंदणी केली नव्हती.