Russia-Ukraine: गेल्या अनेक महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्याचे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण युद्ध थांबले नाही. यातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr Zelenskyy ) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले.
फोनवरील संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितले की, 'कोणत्याही संघर्षावर लष्करी तोडगा असू शकत नाही. संवादाच्या आधारे लवकरात लवकर वैर संपवा आणि युद्ध थांबवा.' यावेळी मोदींनी भारत युक्रेनसह सर्व आण्विक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेला महत्त्व देतो, यावर भर दिला.
मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केलीनुकत्याच झालेल्या SCO शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन संघर्षावर चर्चा केली होती. आजचे युग युद्धाचे नाही, असे पीएम मोदींनी पुतीन यांना सांगितले होते.
अणु प्रकल्प प्रमुखाचे अपहरण युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. नुकतेच युक्रेनच्या अणु प्रकल्प प्रमुखाचे रशियन सैनिकांनी अपहरण केले होते. झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटचे महासंचालक इहोर मुराशोव्ह यांचे रशियन सैनिकांनी अपहरण केले होते. युक्रेनियन आण्विक कंपनी एनरगोटमच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने मुराशोव्हची कार अडवली आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून नेले. कंपनीचे अध्यक्ष पेट्रो कोटिन म्हणाले की, मुराशोव्हच्या अपहरणामुळे अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होईल.