नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्या भीषण युद्ध सुरू आहे. युद्ध दोन देशांमध्ये होतं, पण त्याचा परिणाम जगावर होतो. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थ्यी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता या युद्धामुळे त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 01 मार्च रोजी खारकीवमध्ये रशियन बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने बचावकार्य तीव्र केले. आता हळुहळू सर्व भारतीय विद्यार्थी परतू लागली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी आता मायदेशी परतत आहेत. आता या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडून दिलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्यावर टांगती तलवार आहे.
भारतात अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात का?नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) जारी केलेल्या 2021 च्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स (FMG) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, MBBS अभ्यासक्रमाच्या मध्यभागी परदेशी विद्यापीठातून भारतीय विद्यापीठात हस्तांतरणास परवानगी नाही. कारण प्रवेशाची मार्गदर्शक तत्त्वे आणि निवडीचे निकष या दोघांसाठी वेगळे आहेत. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतरच सरावासाठी भारतात परत येऊ शकतात.
पदवी जाण्याचा धोका?मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय संस्थेतून 12 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल. त्यानंतर भारतात परतल्यावरही 12 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागते. युक्रेनमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी 6 वर्षांचा आहे, त्यानंतर 2 वर्षांचा इंटर्नशिप ज्याला एकूण 8 वर्षे लागतात. 2021 FMG मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एमबीबीएस उमेदवाराने अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर 10 वर्षांच्या आत वैद्यकीय सरावासाठी अर्ज करावा लागतो.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा कालावधी असतो, ज्या दरम्यान ते भारतात वैद्यकीय सरावासाठी अर्ज करू शकतात. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही. तसेच सुटलेला अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार, पूर्ण होणार की नाही याबाबतही माहिती नाही. एमबीबीएस प्रवेशानंतर अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास विद्यार्थ्यांची एमबीबीएसची पदवीही वाया जाईल.
विद्यार्थ्यांसाठी उपाय काय?सध्या भारतीय विद्यापीठात एफएमजीसाठी प्रवेशाची तरतूद नाही. सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसाठी ‘लॅटरल एन्ट्री’सारखा नवा नियम आणला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी निर्णय होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. हे युद्ध सुरू आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे भवितव्यही अंधारातच आहे.