Ukraine Russia War: PM मोदींची EU अध्यक्षांसोबत फोनवर चर्चा, भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:50 PM2022-03-01T20:50:59+5:302022-03-01T20:55:01+5:30
Ukraine Russia War: पीएम मोदींनी फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्याशी फोनवर चर्चा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये चर्चा झाली. यादरम्यान, युक्रेनच्या खारकीवमध्ये झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ट्विटरवर या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी संभाषणात खारकीवमध्ये रशियन हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युरोपीय देश मनापासून मदत करत आहेत.
I expressed my condolences to @PMOIndia for the loss of life of an Indian student in #Kharkiv today due to indiscriminate Russian attacks against innocent civilians.
— Charles Michel (@eucopresident) March 1, 2022
European countries 🇵🇱🇭🇺🇸🇰🇲🇩🇺🇦🇪🇺are wholeheartedly helping Indian citizens to evacuate from #Ukrainepic.twitter.com/VzG3OX3o47
रशियाचा कारकीववर हल्ला
रशियाने मंगळवारी युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकीवर मोठा हल्ला केला. रशियन सैन्यानेही शहरावर अनेक क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी खारकीवच्या मुख्य चौकावरील हल्ल्याला दहशतवादी हल्ला संबोधले आणि त्या कृत्याला युद्ध गुन्हा म्हटले.
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
आज सकाळी रशियन सैन्याने खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. यादरम्यन, युक्रेनमधील खारकीव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव असून, तो अवघ्या 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता.