नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या अंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणले जात आहे. विद्यार्थ्यांचे विमान भारतात दाखल होताच केंद्रातील मंत्री त्यांचे स्वागत करत आहेत. दरम्यान, मोदी सरकारमधील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अजय भट्ट यांनी युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या मुलांसमोर हवाई दलाच्या विमानात नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद वाढला आहे. विद्यार्थ्यांसमोर अजय भट्ट यांनी आधी भारत माता की जय... अशा घोषणा दिल्या. त्याला विद्यार्थ्यांनी दाद दिली. नंतर त्यांनी मोदी जी जिंदाबादच्या घोषणा दिल्या, पण एकाही विद्यार्थ्याने दाद दिली नाही. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्यांना घेऊन विमान आलेरोमानियामधील बुखारेस्ट आणि हंगेरीतील बुडापेस्ट येथून 210 प्रवाशांना घेऊन दोन सी-17 वाहतूक विमाने आज सकाळी हिंडोनमध्ये उतरली. कीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी केल्यापासून आतापर्यंत एकूण 17,000हून अधिक भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत उड्डाणे वाढवण्यात आली आहेत.