Russia Ukraine War: अणुयुद्ध झाल्यास अर्ध्या तासात १० कोटी मृत्यू, १८ हजार वर्षे मागे जाईल जग, मुंबईसारख्या शहरात होईल मृत्यूचं तांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:31 AM2022-03-02T10:31:58+5:302022-03-02T10:32:32+5:30
Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे अणुयुद्ध पेटण्याची भीती बळावली आहे. युक्रेनमधील रशियाचे आक्रमण निर्णायक टप्प्यावर आले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच कुठल्याही बाहेरील देशाने या युद्धात उडी घेतल्यास या आधी कधी पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. त्यामुळे संरक्षण तज्ज्ञ पुतीन यांच्या या इशाऱ्याकडे अणुयुद्धाची धमकी म्हणून पाहत आहेत.
त्यामुळे आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन (ICAN) या संस्थेला २०१७ मध्ये नोबेल पीस प्राईज मिळाले होते. या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.
ICAN च्या रिपोर्टनुसार एक अणुबॉम्ब संपूर्ण शहराला नष्ट करेल. जर आजच्या काळात अनेक अणुबॉम्बचा वापर झाल्यास यामध्ये कोट्यवधी लोक मारले जातील. तसेच अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध सुरू झाल्यास मरणाऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक असेल.
त्यातच मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या जिथे दर चौरस किमीमध्ये एक लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. अशा शहरात हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडल्यास एका आठवडाभरात ८.७० लाख पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जर अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध झाल्यास ५०० अणुबॉम्बचा वापर केला गेला तर अर्ध्या तासात १० कोटींपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल.सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी १ टक्का जरी अण्वस्त्रांचा वापर झाला, तर दोन अब्ज लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्था बिघडेल. जखमींना उपचार मिळणार नाहीत.
हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बसारखे १०० अणुबॉम्ब वापरले गेले, तर जगातील संपूर्ण व्यवस्था बिघडेल. जगातील संपूर्ण वातावरण बिघडेल. शेतीवर विपरीत परिणाम होतील. अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीच्या पृष्टभागावर मोठ्या प्रमाणात धूर जमा होईल. त्यामुळे तापमान दोन अंशांनी घटेल. तसेच जागतिक पर्जन्यमानात ४५ टक्क्यांनी घट होईल. पृथ्वीच्या पृष्टभागावर काही ठिकाणी उणे ७ ते उणे आठ एवढे तापमान होईल. त्यामुळे १८ हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होईल.